Thursday 16 December 2021

असाही एक प्रवास...

असाही एक प्रवास...  

'असं म्हणतात, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो'...

पण काही वेळा माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात आणि मग त्याचा प्रवास सुरु होतो 'जुन्यापासून नव्याकडे जाण्याचा'...  


जेव्हा आपल्याला कोणी म्हणतं ना,'अगं तू बदललीचं नाहीस गं', किंवा 'तू अजून आहेस तशीच आहेस गं',

तेव्हा आपण समजावं की आपण अजून आयुष्यात आहोत तिथेच आहोत.   

खरंच..!! माणसाने बदलावं, वेळेनुसार, परिस्थितीनुसार... बदलावं... तिथेच राहू नये. 

नक्कीच हा बदल सकारात्मक असावा. 


जसे आपल्या स्मार्ट फोन मधील Apps वेळेनुसार update होत असतात ना तसंच आपणही वेळेनुसार, परिस्थितीनुसार update व्हावं. 

आपले दोष स्वीकारून ते दोष कसे कमी करता येतील, दोष कसे घालवता येतील यावर काम करावं आणि स्वतःला बदलावं. 


आपल्या नेहेमीच्या वापरातील WhatsApp चं उदाहरण घ्या, आपण ते नेहेमी update नाही केला तर ते आपोआप बंद होत जोवर आपण ते update करत नाही. बंद व्हायच्या १४ दिवस आधी रोज notification येतं. आणि update नाही केला तर ते बंद होत. 

तसंच आपल्या आयुष्याचं असतं आपण स्वतःला आता update करायला हवं अशा notifications आपल्याला मिळत असतात त्या आपण ओळखून स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःला update केला पाहिजे, नाहीतर आपला टिकाव लागण कठीण. 


Appsचं कशाला आपल्या निसर्गात सुद्धा खूप उत्तम उदाहरण आहे. साप... 

सापाच्या बाह्य पेशी जेव्हा मरू लागतात तेव्हा तो संपूर्ण त्वचा टाकून देतो अर्थातच कात टाकतो. साप जेव्हा कात टाकतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म झालेला असतो. 

कात टाकत असताना सापाला प्रचंड वेदना होत असतात. त्याचाही हा एक प्रवासच असतो जुन्याकडून नव्याकडे जाण्याचा...  

तसंच आहे हो जुन्यातून नव्याकडे जातानाचा हा प्रवास थोडा वेदनादायी असू शकतो, पण हा प्रवास करा. थांबू नका. 


असा हा जुन्यापासून नव्याकडे जाण्याचा प्रवास प्रत्येकाचा सुरु असतो. कधी कळत, तर कधी नकळत.