Tuesday 25 July 2023

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक मनमोहक मंदिर

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक मनमोहक मंदिर  

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, खेड तालुक्यामधील चोरवणे या गावामधील, श्री देव नागेश्ववरच्या पायथ्याशी असलेले हे अतिशय मनमोहक असे 'श्री रामवरदायनी देवीचे मंदिर'... 

चिपळूण पासून साधारण ३३ की. मी. असलेले हे सुंदर गाव. बहादूर शेखचा पूल क्रॉस केल्यावर कळंबस्ते फाट्यावरून आत जाताना निसर्गाचं सुंदर दर्शन घडायला सुरुवात होते. नजर जाईल तिकडे हिरवं गार दृश्य. सुरुवातीची काही दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली, पण जस-जसे पुढे गेलो तसं मोबाईल बाजूला ठेवून तो निसर्ग डोळ्यात भरून घेण्याची इच्छा झाली. ती दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याची नाही तर प्रत्यक्षात अनुभवण्याची होती. काहीवेळ शूट करता-करता ते सगळं पहायचं, अनुभवयचं राहूनच जातं, नाही का..?

हिरवा शालू पांघरलेले डोंगर, त्या डोंगरातून वाहणारे छोटे-छोटे धबधबे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी हिरवीगार शेती, त्या शेतात काम करणारे शेतकरी, चरायला सोडलेली गुरं, कौलारू घरं, कधी रिमझिम तर कधी जोरदार पडणारा पाऊस, खाली आलेले ढग हे दृश्य खूपच मनमोहक होत. जसं जसे चोरवणे गाव जवळ येत होतं, तसं-तसं सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यातून वाहणारे पांढरे-शुभ्र, खळखळ आवाज करत जाणारे पाणी मन वेधून घेत होते. हेच पाणी पुढे जाऊन चिपळूण शहरात वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीला येऊन मिळतं, म्हणजे यांच कडे-कपाऱ्यांतून या नदीचा उगम झाला आहे असे म्हणू शकतो. 

'श्री रामवरदायनी देवीचे मंदिर' असंच निसर्गाच्या कुशीत वसले आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास आम्ही या मंदिराच्या जवळ पोहोचलो आणि  देवळात चालू असलेल्या आरतीचा आवाज आमच्या कानावर पडू लागला आणि मंदिर पहाण्याची आमची उत्सुकता अजूनचं वाढू लागली. अखेरीस एक ते सव्वा तासाचा प्रवास करून आम्ही या मंदिराजवळ पोहोचलो आणि काळ्या पाषाणात बांधलेलं मंदिर आम्ही पाहिलं आणि पहातच राहिलो. आजूबाजूची हिरवीगार शेती, मागे उभा असलेला हिरवागार डोंगर आणि खाली आलेले ढग या मंदिराची शोभा अजूनच वाढवत होते. मंदिरात असलेली श्री रामवरदायनी देवीची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. रेखीव, आभूषणांनी सजलेली देवी, देवीचा हसरा चेहरा, सुंदर प्रभावळ हे सगळं आम्ही मनात साठवून घेतलं, आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 

एकदा तरी खास करून पावसाळ्याच्या मौसमात भेट द्यावं असं हे  'श्री रामवरदायनी देवीचे मंदिर'... 

नक्की भेट द्या.